जळगाव, 29 डिसेंबर : राज्यातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार आज आणि उद्या उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र, जळगाव महानगरपालिकेसाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीबाबत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात काल 28 डिसेंबर रोजी बैठक पार पडल्यानंतरही जागावाटपाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
रात्री उशिरापर्यंत बैठकांवर-बैठका –
भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीसंदर्भात तिनही पक्षातील नेत्यांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. जळगावातील एका नामांकित हॉटेलमध्ये काल 28 डिसेंबर रोजी रात्री देखील उशिरापर्यंत बैठक पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे हे एका दृश्यात दिसून आले. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे देखील त्या हॉटेलमध्ये पोहोचल्याचे दिसून आले.
आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया –
आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव महानगरपालिकेच्या युतीसंदर्भात बोलताना सांगितले की, जळगावच्या युतीसंदर्भातील चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. युतीची घोषणा आधीच करण्यात आलेली आहे. फक्त जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत व्हायचं बाकी आहे. सोमवार दुपारपर्यंत आमदार सुरेश भोळे, महानगरप्रमुख तसेच इतर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करून जागावाटपाचा निर्णय होईल.
काही ठिकाणी भाजपची सीट असल्याने दोन-तीन जागांवर तिढा आहे. मात्र, जळगावात महायुती म्हणून लढण्यात काहीही अडचण नाहीये. दरम्यान, जागांवरून काही तिढा निर्माण झाला तर त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. पण मला वाटत नाहीये की असं काही होईल, असेही आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.






