जळगाव, 16 जानेवारी : जळगाव महानगरपालिका निवडणुकींच्या धामधूम अंतिम टप्प्यात पोहचली आहे. गेल्या महिनाभरापासून झालेल्या घडामोडींनंतर काल 15 जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान पार पडले. यामध्ये जळगाव शहरात एकूण 53.59 टक्के इतके मतदान झाले असून आता निकालाकडे संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
जळगावात 53.59 टक्के मतदान –
जळगाव शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदाराचा उत्साह दिसून आला. सायंकाळी शहरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे गर्दी केली होती. दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2,34,996 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार १,२२,८५८, स्त्री मतदार १,१२,१३३ तर इतर प्रवर्गातील ५ मतदारांनी आपला हक्क बजावला. तसेच एकूण २,३४, ९९६मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
आज सकाळी मतमोजणीला होणार सुरूवात –
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. शहरातील एमआयडीसी परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, आज दुपारी 2 वाजेपर्यंत महानगपालिका निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जळगावात सत्ता कुणाची? –
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 19 प्रभागांमधून एकूण 75 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. यापैकी 12 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, उर्वरित 63 जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. या संपुर्ण निवडणुकीत उमेदवारांनी गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार प्रचार केला आहे. महायुती, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आज 16 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, कोणाच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.






