मुंबई, 18 जानेवारी : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत असून या मालिकेचा हा 14 वा लेख आहे.
आजपासून १११ वर्षांपूर्वी, म्हणजे दिनांक १४ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी पहिल्यांदा मलबार हिल येथील ‘लोकभवन’ येथे आले होते. अर्थात त्यावेळी ते ‘लोकभवन’ तर नव्हतेच; पण ‘राजभवन’ देखील झाले नव्हते. तर ते होते मुंबई प्रांताच्या ब्रिटिश गव्हर्नरचे निवासस्थान – ‘गव्हर्मेंट हाऊस ऑफ बॉम्बे’.
सन १९१५ साली मुंबई प्रांताच्या सीमा बऱ्याच विस्तारल्या होत्या. त्यामध्ये आजच्या महाराष्ट्राचा निम्म्याहून अधिक भाग, गुजरातचा मोठा प्रदेश, कर्नाटकचे काही जिल्हे, पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि येमेनचे देशातील एडन यांचा समावेश होता. मुंबईचे गव्हर्नर होते लॉर्ड विलिंग्डन आणि विलिंग्डन हे एकच मुंबईचे गव्हर्नर आहेत जे पुढे पाच वर्षे (१९३१-१९३६) भारताचे व्हाइसरॉय देखील झाले होते.
दक्षिण मुंबईतील विलिंग्डन क्लब यांच्याच नावाने आहे. पण ते असो. दक्षिण आफ्रिकेत दोन दशके व्यतीत केल्यानंतर दिनांक ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी जहाजाने मुंबईला पोहोचले. (त्यामुळे या दिवशी ‘प्रवासी भारतीय दिवस’ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.) अपोलो बंदर येथे उतरल्यावर महात्मा गांधींचे जंगी स्वागत करण्यात आले.
तीन दिवसांनी जहांगीर पेटिट यांच्या बंगल्यावर गांधीजींचा मुंबईतील जनतेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. गांधीजींचे राजकीय महत्व जाणून गव्हर्नर विलिंग्डन यांनी गांधीजींना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यानुसार, महात्मा गांधी यांनी मलबार हिलच्या ‘गव्हर्नमेंट हाऊस’ येथे दिनांक १४ जानेवारी रोजी गव्हर्नर विलिंग्डन यांची भेट घेतली. या भेटीबाबत त्या कालच्या वृत्तपत्रात ओझरता उल्लेख आहे.
महात्मा गांधीजींनी ‘माझे सत्याशी प्रयोग’ या आत्मचरित्रामध्ये आजचे ‘लोकभवन’ येथे झालेल्या या भेटीबाबत लिहिले आहे. काय लिहिले आहे विलिंग्डन यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत?
त्यांच्याच शब्दात :
“मुंबईत जेमतेम पोहोचलो असेन.. गोखले यांनी मला निरोप पाठवला की गव्हर्नर मला भेटण्यास इच्छूक आहेत; शक्यतोवर पुण्याला निघण्यापूर्वी गव्हर्नरना भेटावे. त्यानुसार, मी ‘हिज एक्सलंसीं’ची भेट घेतली. सुरुवातीला नेहमीची विचारपूस केल्यावर ते म्हणाले: ‘माझे आपणास एक सांगणे आहे. ज्या-ज्यावेळी आपण शासनासंदर्भात काही पाऊले उचलणार असाल त्यावेळी प्रथम मला येऊन भेटावे.’
त्यावर मी म्हणालो : ‘काहीच हरकत नाही; एक सत्याग्रही म्हणून माझा नियमच असा आहे की समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन प्रथम समजून घ्यावा, आणि शक्यतोवर त्याचाशी सहमत व्हावे. हा नियम दक्षिण आफ्रिकेत देखील कसोशीने पाळला आणि तो मी येथे देखील पाळणार आहे.’
लॉर्ड विलिंग्डन यांनी माझे आभार मानले आणि म्हणाले :
‘आपणांस वाटेल, त्यावेळी निःसंकोच मला भेटण्यास यावे, आणि मी संपूर्ण जबाबदारीने सांगतो की माझे शासन जाणीवपूर्वक कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही.’ ‘याच विश्वासावर तर मी मार्गक्रमणा करीत आहे’, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर मी पुण्याला रवाना झालो.”
गांधीजींना अटक –
मजेची गोष्ट म्हणजे ज्या लॉर्ड विलिंग्डन यांनी महात्मा गांधी यांचे सन १९१५ साली मुंबई येथे स्वागत केले होते, त्याच विलिंग्डन यांनी ते व्हाइसरॉय झाल्यावर दिनांक ४ जानेवारी १९३२ रोजी गांधीजी आणि पंडित नेहरू दोघांनाही अटक केली होती. ‘सविनय कायदेभंगाची चळवळ’ नव्याने सुरु केल्याबद्दल ही अटक करण्यात आली होती.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)
हेही वाचा : किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 13 | मलबार हिल लोकभवन परिसराची पूर्वकथा






