जळगाव, 21 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील वनविभागातील एका प्रकरणात लाच मागणी व स्वीकारल्याप्रकरणी वनपाल राजेंद्र अमृत सरदार आणि खासगी इसम दिपक रघुनाथ तायडे (रा. अहिरवाडी) यांच्याविरोधात जळगाव एसीबीने कारवाई केली आहे. जिन्सी वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या एका वनरक्षकाकडून निलंबन टाळण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्य प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार वनरक्षक रावेरमधील जिन्सी येथील रोपवनातील निंदणीच्या कामावर कार्यरत असताना, सप्टेंबर २०२४ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची तपासणी झाली होती. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी वनपाल राजेंद्र सरदार यांनी व्हॉट्सॲप कॉल करून निलंबनाची भीती दाखवत ते टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम आरोपी दिपक तायडे याच्या फोनपे खात्यावर पाठवण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराकडे फोनपे नसल्याने, योनो ॲपद्वारे १३,२५० रुपये मित्राच्या फोनपे खात्यातून आरोपीच्या खात्यावर पाठवण्यात आले, तर उर्वरित १,७५० रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.
यानंतरही तक्रारदाराला १२ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. निलंबनातून मुक्त करण्यासाठी पुन्हा पैसे लागतील, असे सांगत आरोपीने वरिष्ठांवर प्रभाव टाकण्याचे आश्वासन दिले. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने १६ ऑक्टोबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणीदरम्यान, आरोपीने यापूर्वी लाच स्वीकारल्याची कबुली पंचांसमक्ष दिली.
दोघांविरोधात रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल –
तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपी दिपक तायडे याने स्वतःच्या फोनपे खात्यावर लाच रक्कम स्वीकारून ती एटीएमद्वारे काढून आरोपी वनपालाला दिली. त्यामुळे लाच स्वीकारण्यास मदत केल्याप्रकरणी जळगाव एसीबीचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून वनपाल अमृत सरदार आणि दीपक तायडे या दोघांवर रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे वनविभागातील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्यासह पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ राकेश दुसाने आदींनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा : विद्यार्थांनो अभ्यास करा! दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज






