चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
सामनेर (पाचोरा), 21 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील सामनेर गावातील ओमसाई प्रदीप पाटील, अविनाश रोहिदास पाटील आणि रोहित बापूराव पाटील या तिन्ही युवकांची अनुक्रमे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) मध्ये निवड झाली आहे.
कठोर मेहनत, शिस्त आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर गावातील तिन्ही युवकांनी केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये स्थान मिळवलंय. दरम्यान, दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असताना एकाच गावातून तिघांची सुरक्षा दलात एकाच वेळी झालेली निवड होण्याची बाब इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरली असून देशसेवेची परंपरा असलेल्या गावाच्या अभिमानात भर पडली आहे.
अविनाश पाटील बीएसएफमध्ये भरती –
अविनाश रोहिदास चव्हाण या तरूणाने विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करत सुरक्षा दलातील भरतीसाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून तयारी सुरू केली होती. दरम्यान, स्टाफ सिलेक्शनच्या 2024-25 च्या भरती प्रक्रियेत लेखी, शारिरीक तसेच वैद्यकीय चाचणींमध्ये त्याने पात्रता मिळवत वयाच्या 25 व्या वर्षी भारतीय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती होण्यात यश मिळवलंय. तत्पुर्वी, मागील वर्षी अवघ्या 1 मार्क्सने भारतीय सीमा सुरक्षा दलात ट्रेडमनपदासाठी अविनाशची निवड हुकली होती.
गेल्या तीन चार वर्षांपासून सराव करत असताना मन स्थिर झालं होतं. यासोबतच, आपली निवड नक्की होईल असा आत्मविश्वास देखील प्राप्त झाला होता. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर सुरूवातीचे काही क्षण स्तब्ध झालो होतो. पण, बीएसएफमध्ये निवड झाल्यानंतर मनापासून आनंद झाला. दरम्यान, सुरक्षा दलांत भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या तरूणांनी अर्ध्यात न थांबता शेवटपर्यंत सातत्यपुर्ण प्रयत्न केले पाहिजे. परेमश्वर, आई-वडील आणि स्वतःवर देखील त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. यामुळे एकदिवशी यश नक्की मिळते.
-
अविनाश चव्हाण (बीएसएफमध्ये निवड झालेला तरूण)
ओमसाई पाटीलची सीआयएसएफमध्ये निवड –
ओमसाई प्रदीप पाटील याने जळगावातील एम.जे. कॉलेजमधून कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केलं आहे. यासोबतच, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून तो सुरक्षा दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. अशातच, एसएससीच्या नुकताच जाहीर झालेल्या निकालात त्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) निवड झाली आहे. दरम्यान, देशातील महत्त्वाच्या औद्योगिक व सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या दलात त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे.
मी गेल्या चार-साडेचार वर्षांपासून गावातच राहून भरतीची तयारी करत होतो. स्टाफ सिलेक्शनच्या 2024-25 च्या भरती प्रक्रियेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून माझी सीआयएसएफमध्ये निवड झाली आहे. लेखी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून तयारी केली असून यामध्ये आरडब्ल्यूए अॅपची मदत झाली. दरम्यान, युवकांनी भरतीच्या तयारीसोबत शिक्षण चालू ठेवले पाहिजे.
-
ओमसाई पाटील (सीआयएसएफमध्ये निवड झालेला तरूण)
रोहित पाटीलची आयटीबीपीमध्ये निवड –
रोहित बापूराव पाटील या तरूणाचे विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाले आहे. आयुष्यात आपण फौजी झालं पाहिजे, असे एकमात्र ध्येय लहानपणापासून मनात असल्याने मागील एक ते दीड वर्षापासून तो सुरक्षा दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. दरम्यान, 15 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या एसएससीच्या निकालात त्याची भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस दल अर्थात आयटीबीपीमध्ये निवड झाली.
आयुष्यात आपण फौजी झालं पाहिजे, असे लहानपणापासूनचे स्वप्न होते. या पार्श्वभूमीवर मागील एक-दीड वर्षांपासून सुरक्षा दलात भरती होण्यासाठी तयारी सुरू होती आणि पहिल्याच प्रयत्नात आयटीबीपीमध्ये निवड झाल्याने मेहनतीला फळ आले आहे. दरम्यान, करिअर निश्चित केल्यानंतर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले पाहिजे. अशक्य असे काहीही नाही. केवळ आपल्या प्रयत्नांनी ते आपल्यालं हवं असलेले ध्येय आपण प्राप्त करू शकतो.
-
रोहित पाटील (आयटीबीपीमध्ये निवड झालेला तरूण)
सामनेरला आहे देशसेवेची परंपरा –
सामनेर गावाची ओळख ही गेल्या अनेक वर्षांपासून देशसेवेसाठी युवक घडवणारे गाव म्हणून आहे. यापूर्वीही या गावातून अनेक युवकांनी सैन्य, वायुदल व नौदलासह विविध केंद्रीय सुरक्षा दल तसेच महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावली आहे. ही परंपरा आजही कायम असून, ओमसाई पाटील, अविनाश पाटील आणि रोहित पाटील यांच्या निवडीमुळे ती आणखी बळकट झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
हेही वाचा : निलंबन टाळण्यासाठी वनरक्षकाकडून घेतली लाच अन् वनपालसह खासगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?






