जळगाव, 23 जानेवारी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद यांच्या वतीने दिला जाणारा ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ निलेश साहेबराव सोनवणे यांना जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन येथे नुकत्याच आयोजित कार्यक्रमात शिक्षक आमदार नाशिक विभागचे किशोर दराडे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार किरण सोनवणे, भरत शिरसाठ, रणजित सोनवणे, डी.के.अहिरे, भैय्यासाहेब सोनवणे, अजय भामरे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर,शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश साहेबराव सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय धारशेरी येथे कार्यरत असून त्यांनी अध्यापनाबरोबरच नवोपक्रमशील शिक्षणपद्धती, मूल्यशिक्षण, वाचनसंवर्धन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशासोबतच जीवनमूल्यांची जाणीव विकसित केली आहे.
दरम्यान, या पुरस्कारामुळे निलेश सोनवणे यांचे कार्य राज्यस्तरावर गौरविले गेले असून शाळा व्यवस्थापन, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, तसेच माझे गुरुवर्य आर.डी.पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भविष्यातही शैक्षणिक, सामाजिक व समाज प्रबोधनाचे कार्य अखंडपणे चालू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व समाजाभिमुख कार्याची दखल तसेच ते अनेक वर्षापासून शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार करीत आहे. भारतीय संविधानामधील समता, स्वातंत्र,बंधुता, व न्याय या मूल्यांचे आचरण करून त्यांचे विविध घटकांपर्यंत प्रसार करीत आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व समाज प्रबोधन या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.






