जळगाव, 24 जानेवारी : पंचायत समिती अमळनेर येथे शासकीय कामकाजात बनावट कागदपत्रे तयार करून गैरप्रकार केल्याप्रकरणी संबंधित संशयित योगेश मोहन पवार (रा. अमळनेर) या व्यक्तीविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी अमळनेर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी नरेंद्र रामसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपीने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट सही करून तसेच खोटे दस्तऐवज तयार करून शासकीय कामकाजात वापर केल्याचा आरोप आहे. सदर प्रकारामुळे कार्यालयीन शिस्त व प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल, संबंधित तक्रारी, नोटीस, खुलासे व कागदपत्रांचा अभ्यास करून प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचा प्रकार आढळून आल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४) व ३४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. खुलासे सादर करण्यात आले असले तरीही अहवाल व पुराव्यांच्या आधारे सदर बाब अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्याने फौजदारी कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत असून, दोषी आढळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता, शिस्त व कायद्याचे पालन राखण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई






