मुंबई, 31 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघाताने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असताना मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. असे असताना मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली असून आज सायंकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड –
सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार असल्याचे बातम्या समोर येत होते. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच आमदार विधानभवानात दाखल झाल्यानंतर आज दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली.
आधी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुनेत्रा पवारांच्या गटनेतेपदाच्या निवडीसाठी दिलीप वळसे-पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि यानंतर या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण 42 आमदार उपस्थित होते.
आज सांयकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ –
सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. आता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी लोकभवनात आज संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राने एक कर्तुत्ववान नेता विमान अपघातात गमावला. मात्र, अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी हा वारसा पुढे नेणार असून त्या आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.






