बारामती, 4 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. विमान जमिनीवर उतरत असतानाच त्याला भीषण अपघात झाला व स्फोट झाला. दरम्यान, अजित दादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, विमान अपघाताच्या अवघ्या काही मिनिटांपुर्वी फोन कॉलवरून ते शेवटचं कोणाशी बोलले याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांनी एका कार्यकर्त्याशी फोनवर साधला होता संवाद –
अपघाताच्या काही मिनिटे आधी अजित पवार यांनी एका कार्यकर्त्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन कॉल सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी झाला होता. श्रीजीत पवार नावाच्या कार्यकर्त्याशी झालेला हा संवाद त्यांचा शेवटचा कॉल असल्याचा दावा करण्यात येत आहे. श्रीजीत पवार हे अजित पवार यांचे नातेवाईक असल्याचीही माहिती आहे.
विमान उंचीवर असताना मोबाईलला रेंज नसल्याने पाठवलेला संदेश उशिरा पोहोचला. मात्र, विमान लँडिंगसाठी रेंजमध्ये येताच अजित पवार यांनी तात्काळ फोन करून संवाद साधला. विमानात असतानाही कामाबाबतची त्यांची तत्परता या कॉलमधून दिसून येते, असे श्रीजीत पवार यांनी सांगितले.
View this post on Instagram
…अन् तो अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल ठरला –
या संवादात जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीबाबत चर्चा झाली. “आपण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालतो आणि सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतो,” असे अजित पवार यांनी कॉलदरम्यान सांगितले. माळी समाजाला जिल्हा परिषद उमेदवारी दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला. “जिथे ओबीसी आरक्षण होतं तिथेच उमेदवारी दिली आहे, इतर ठिकाणी पक्षाने वेगळे निर्णय घेतले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
साधारण एक मिनिट चाललेल्या या संभाषणानंतर कॉल संपला. काही वेळातच विमान अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली. कार्यकर्त्याशी असलेला हा संवादच अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल ठरला.
हेही वाचा : ‘सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून….!’ खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य






