नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम असून भारताने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकत नामिबियावर तब्बल ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत नामिबियासमोर २१० धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या अचूक आणि भेदक माऱ्यासमोर नामिबियाचा डाव टिकू शकला नाही.
टीम इंडियाचा सलग दुसरा विजय –
नामिबियाला पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत; भारतीय संघाने त्यांना १८.२ षटकांत ११६ धावांवर गुंडाळले. विशेष म्हणजे, सामना संपायला अजून १० चेंडू बाकी असताना नामिबियाचा अखेरचा गडी बाद झाला. यापूर्वी अमेरिकेविरुद्ध विजय मिळवलेल्या भारताने आता नामिबियालाही पराभूत करत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नामिबियाविरुद्धचा हा भारताचा एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती –
नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय डावात इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी प्रभावी खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. इशान किशनने संयमी आणि आक्रमक फटकेबाजीचा मिलाफ साधत सर्वाधिक ६१ धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने अवघ्या २८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत ५२ धावांची झंझावाती खेळी साकारली.
मधल्या फळीत संजू सॅमसन, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनीही उपयुक्त योगदान देत डावाला गती दिली. या तिघांनी अनुक्रमे २२, २३ आणि २५ धावा करत संघाची धावसंख्या मजबूत केली. या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ९ बाद २०९ धावांचा डोंगर उभारला. नामिबियाकडून गेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक ४ विकेट्स घेत भारतीय फलंदाजांना काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला.
२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने लॉरेन स्टीनकॅम्प आणि जॅन फ्रायलिंक यांच्या सलामी जोडीच्या जोरावर ३३ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली; फ्रायलिंक २२ धावांवर बाद झाल्यानंतर स्टीनकॅम्पने लॉफ्टी-ईटनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३४ धावा जोडल्या, मात्र स्टीनकॅम्प २९ धावांवर माघारी परतताच भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवत ठराविक अंतराने विकेट्स घेत डाव गुंडाळला.
टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय –
भारताकडून एकूण सहा गोलंदाजांनी मारा केला आणि सर्वांनी किमान एक बळी घेतला; वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेत नामिबियाचा कणा मोडला, तर फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या हार्दिक पंड्याने अक्षर पटेलसह प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या आणि अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह व शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, टीम इंडियाने नामिबियावर दणदणीत एकतर्फी विजय मिळवत टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला.






