ईसा तडवी
पाचोरा, 18 ऑगस्ट: पाचोरा शहरातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखान्याबाबत’ आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून बोगस डॉक्टर शोध समितीने अचानक तपासणी केली. या तपासणीत संबंधित डॉक्टरकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी (Degree) किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून न आल्याने सदर दवाखाना आज, मंगळवारी आरोग्य विभाग आणि नगरपालिकेकडून सील करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर येथील अमित मंडल हे ‘चांदसी दवाखाना’ चालवत होते. या दवाखान्याबाबत तक्रार आल्यानंतर पाचोरा शहर बोगस डॉक्टर शोध समितीने तातडीने चौकशी व तपासणी केली. या तपासणी दरम्यान अमित मंडल यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही प्रमाणपत्र किंवा पदवी नसल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे आणि ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज १८ ऑगस्ट २०२६ रोजी ही कारवाई करून दवाखाना सील करण्यात आला. या कारवाईच्या वेळी पाचोरा नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे परिसरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.






