जळगाव, 19 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. गावठी दारूला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती घेत हातभट्टी चालकांवर मोठी कारवाई केली आहे.
प्रशासनाची मोठी कारवाई –
राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या 92 जणांना अटक केली आहे. प्रशासनाने केलेल्या या कारवाईत तब्बल 7 लाख 52 हजार 255 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 17 व 18 ऑगस्ट या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 40 गुन्हे नोंदविले आहेत.
तब्बल 92 जणांना अटक –
राज्य उत्पादन शुल्क व जळगाव जिल्हा पोलीस दलाने 18 ऑगस्ट रोजी संयुक्त मोहीम राबवित तब्बल 105 गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईमध्ये 92 जणांना अटक केली आहे. तसेच इतर 13 जणांचा गावातील तलाठी व पोलीस पाटील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमध्ये 1 हजार 324 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच गावठी दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे 18 हजार 673 लीटर रसायन नष्ट करण्यात आले. दरम्यान, या कारवाईत 7 लाख 52 हजार 255 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गावठी दारूविरोधात प्रशासन आक्रमक –
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार व पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही हातभट्टी दारू विरोधात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.