नाशिक, 4 एप्रिल: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी कार पाण्याने पूर्ण भरलेल्या विहिरीत कोसळल्याने संपूर्ण राज्य हादरले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्वजण खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये पालकांसह 6 लहान मुलांचाही समावेश आहे.
या भीषण अपघातानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि दिंडोरीचे आमदार तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध असलेल्या ज्या विहिरीत कार कोसळली, त्या विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित खाजगी क्लासचे चालक-संचालक सचिन वडजे यांचीही चौकशी केली जाणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय? –
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वाहन विहिरीत कोसळण्याच्या घटनास्थळाची पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. याबाबत ते म्हणाले की, वाहन विहिरीत कोसळण्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या वारसांना राज्य शासनाकडून ₹5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
मंत्री गिरीश महाजन यांनी आज तत्काळ घटनास्थळी भेट देऊन दुर्घटना स्थळाची पाहणी केली आणि मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंत्री महाजन यांनी सदर घटनेची माहिती घेतली. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी






