मुंबई, 2 मे: महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान लोकभवन मुंबई येथे आहे. या लोकभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘किस्से लोकभवनाचे’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, किस्से लोकभवनाचे या मालिकेचा हा 22 वा लेख आहे.
सचिन तेंडुलकर आणि मलबार हिल येथील महाराष्ट्र लोकभवनाच्या आठवणींचा धांडोळा घेऊ गेल्यास त्या स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातात. आता त्या कश्या? तर सन १९८८ साली मुंबईत झालेल्या हॅरिस शिल्ड आंतर शालेय स्पर्धेत सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली होती.
ज्या लॉर्ड हॅरिस यांच्या नावाने ‘हॅरिस शिल्ड’ स्पर्धा खेळली जाते, ते मुंबई प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज हॅरिस हे १८९० -१८९५ ही पाच वर्षे आज लोकभवन उभे असलेल्या ‘गव्हर्नमेंट हाऊस’ येथे वास्तव्यास होते !
हात बँडेजमध्ये –
सुनील गावस्कर यांना सन १९९४ साली मुंबईचे नगरपाल (Sheriff of Bombay) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये सुनील गावस्कर यांना राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी पदाची शपथ दिली होती.
या शपथविधीला मुख्यमंत्री शरद पवार उपस्थित होते तसेच निमंत्रितांमध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर उदयाला आलेले सचिन तेंडुलकर हे देखील होते. अलेक्झांडर यांचे मागे उभे असलेले पोलीस एडीसी म्हणजे अलीकडेच निवृत्त झालेले पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर.
सचिन तेंडुलकर यांच्या हाताला त्यावेळी इजा झाली होती व हात बँडेजमध्ये होता. या कार्यक्रमानंतर सचिनने बँडेजवर इतर उपस्थित खेळाडूंच्या सह्या घेतल्या होत्या, असे जुने लोक सांगतात.
राष्ट्रपतींचे चहापान –
वानखेडे स्टेडियमवर दिनांक २ एप्रिल २०११ रोजी भारताने श्रीलंकेला हरवून विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला चहापानासाठी राजभवन येथे निमंत्रित केले होते.
या कौतुक सोहळ्याला राज्यपाल के शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अर्थात सोहळ्याचा केंद्रबिंदू होते ते म्हणजे सचिन तेंडुलकर.
संस्मरणीय छायाचित्र-
राज्यपाल सी विद्यासागर राव व सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत दिनांक १९ डिसेंबर २०१४ रोजी ‘मिड-डे’चे छायाचित्रकार अतुल कांबळे यांना ‘यस बँक – पिक्चर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये खेळ संपवून पॅव्हिलियनमध्ये परत जात असताना अतुल कांबळे यांनी हे प्रसिद्ध छायाचित्र काढले होते.
पर्यावरण प्रेमी सचिन –
राजभवन येथे दिनांक १७ सप्टेंबर २०१७ रोजी ‘नद्या वाचवा’ या विषयावर ‘रॅली फॉर रिव्हर्स’ व वृक्ष लागवड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांसह सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते.
एक्झाम वॉरियर सचिन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक २७ जानेवारी २०१८ रोजी विद्यार्थ्यांनी परीक्षांना धैर्याने कसे तोंड द्यावे या दृष्टीने लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन राजभवन येथे झाले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जैन इरिगेशनचे अनिल जैन व सचिन तेंडुलकर उपस्थित होते.
रिलॅक्स मूड मधील सचिन –
सचिन तेंडुलकर यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची व करोना काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली होती.
राष्ट्रपती कोविंद व सचिन –
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन करण्यात आले. या दिवशीच सचिन तेंडुलकर यांनी राष्ट्रपती कोविंद यांची राजभवन येथील अतिथीगृहात भेट घेतली होती.
लोकप्रिय सचिन –
सचिन तेंडुलकर राजभवन – आता लोकभवन – येथे येणार समजले की येथील कर्मचारी – अधिकारी सचिन सरांसोबत एक तरी फोटो मिळावा यासाठी उत्सुक असतात. येथील अनेकांकडे सचिन सोबतचे फोटो आहेत. सर्वांकडून सचिन सरांना हार्दिक शुभेच्छा !!
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)
हेही वाचा: किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!






