जळगाव, 20, मे: पशूपालन हा खानदेशातील महत्त्वाचा कृषीपूरक व्यवसाय असून, पशुपालन करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, पूर्वी पेक्षा मोठ्या प्रमाणात विविध योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत.पशू पालन हा अत्यंत अवघड व्यवसाय आहे. पशू पालनाचा मी स्वत अनुभव घेतलेला असून निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारण्यास निश्चितच यात यश येते.
जळगाव जिल्ह्यात पशुपालनाला पोषक वातावरण –
जळगाव जिल्ह्यात काही भागात समृद्ध शेती केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात पशुपालनाला पोषक असे वातावरण आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून शेळी,मेंढी व कुक्कुट पालनासाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागाच्या योजना तळागाळातील पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पशुपालनाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मदत होणार – सीईओ करिश्मा नायर
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आपल्या मनोगतात पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना प्रकाशझोतात आणण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेमुळे पशुपालनाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे.या कार्यक्रमात “पशुधन वार्ता” या मासिकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.






