चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 23 मे : राज्यातील 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुत्रांकडूनही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली जात असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका –
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पाचोरा-भडगाव नगरपरिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजय आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य लक्षात घेता कार्यकर्त्यांची इच्छा सुमित पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही जागा भाजपची आहे. पण, गेल्या 25 वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रामाणिक साथ दिल्यामुळे आता भाजपने ‘मोठा भाऊ’ म्हणून जळगाव विधानपरिषदेची जागा शिवसेनेला सोडावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. तसेच, इच्छुक उमेदवार असणे म्हणजे पक्षांतर्गत कलह नसून पक्षाची ताकद असल्याचे स्पष्ट करत, अखेरचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नमूद केले.
अभ्यास दौऱ्यातून परतताच आमदार किशोर आप्पा पाटील अँक्टिव्ह मोडमध्ये –
दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे मागील काही दिवसांपासून पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवकांसह केरळ येथे अभ्यास दौऱ्यावर गेले होते. मात्र, दौऱ्यावरून परतताच आमदार पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाल्याचे दिसून आले. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत माध्यमांशी संवाद साधताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
माध्यमांशी संवाद साधताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीत आपण स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. त्या निवडणुकीत पाचोरा-भडगावकरांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे शिवसेनेला ऐतिहासिक विजय मिळाला. सध्यास्थितीत जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगरसेवक पाचोरा-भडगाव नगरपरिषदेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य अधिक असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर सुमित यांनी ही निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, संबंधित जागा सध्या भारतीय जनता पक्षाकडे असल्याचे नमूद करत, “ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाजपने ही जागा शिवसेनेसाठी सोडावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
‘भाजपने जळगावची जागा शिवसेनेला सोडावी’ –
माध्यमांशी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधोरेखित करत भाजपने विधानपरिषदेची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे एक मंत्री, पाच आमदार तसेच एक माजी खासदार आणि आमदार अशी मोठी राजकीय ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे दोन्ही खासदार आणि विधानपरिषद सदस्य भाजपकडे असल्याचे नमूद करत, “आजपर्यंत आम्ही भाजपला प्रामाणिकपणे साथ दिली असून, त्यामुळंच भाजपला हे यश मिळू शकले आहे. त्यामुळे भाजपने मोठा भाऊ म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी,” असे ते म्हणाले. यासंदर्भात पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यासोबत चर्चा करून भाजपकडे औपचारिक मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“….तर ही जागा पुर्ण ताकदीने लढू आणि 100 टक्के जिंकू!” –
विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाबाबत राज्यस्तरावर सध्या वाटाघाटी सुरू असल्याचे सांगत, प्रत्येक पक्षाकडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची नावे तयार असल्याचेही आमदार पाटील यांनी नमूद केले. “शिवसेनेनेही या जागेसाठी आपली मागणी मांडली आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळेल, असा विश्वास आहे. आणि जर ही जागा शिवसेनेला मिळाली, तर आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून 100 टक्के विजय मिळवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, याबाबत राज्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केले.
View this post on Instagram
शिवसेनेतील अंतर्गत कलहाच्या चर्चांवर आमदारांचे स्पष्टीकरण –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी चर्चा सुरू असतानाच, पाचोरा मतदारसंघातून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या नावाचीही जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, या चर्चांवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “भाजपमध्ये देखील चार-पाच जण इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेतही अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे पक्षांतर्गत कलह असल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य आणि मताधिक्य असल्यामुळेच अनेक इच्छुक पुढे येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, इच्छुक उमेदवारांबाबत शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नमूद केले.
‘गेल्या 25 वर्षांपासून जळगावात लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपच्या पाठीशी!’ –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा उल्लेख करत, गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभी राहिल्याचा दावा केला आहे. “जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना आम्ही 100 टक्के पाठिंबा दिला असून, महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने हा मतदारसंघ जिंकून दिला आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, चाळीसगावचे आमदार भाजपचे, तर अमळनेरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मात्र, उर्वरित बहुतांश आमदार शिवसेनेचे असूनही जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे जळगाव विधानपरिषदेची जागा शिवसेनेला सोडावी, ही आमची ठाम आणि आग्रही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ ऑफर देण्यापेक्षा भाजपने थेट जळगावची जागा शिवसेनेला द्यावी,” अशी स्पष्ट भूमिका आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मांडली.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम –
- अधिसूचना जारी : 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
- अर्जाची छाननी : 2 जून
- अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
- मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
- मतमोजणी : 22 जून






