धुळे, 3 सप्टेंबर : लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माहिती मिळताच नृत्यंगना गौतमी पाटील हिने तिच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे बोलावून घेतले आहे.
गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील असे असून त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसारमाध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली. गौतमी पाटीलने तिच्या वडिलांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये असे तिच्या मावशीला सांगितले. दरम्यान, तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले व या ठिकाणी त्यांच्या मावशी व धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेली.
गौतमी पाटीलने याबाबत म्हणाली की, वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेल. तसेच त्यांचे पुढील उपचार मी पुण्यालाच करेल. दरम्यान, धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी देखील गौतमी पाटीलच्या वडिलांची त्यांच्यावतीने काळजी घेत एक मदतीचा हात दिल्याने गौतमी पाटीलने त्यांचे आभार मानले.