ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 नोव्हेंबर: राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले एनसीएमसी कार्ड अद्याप न काढलेल्या लाभार्थ्यांसाठी पाचोरा आगारातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील लासगाव, खडकदेवळा आणि लोहटार या तीन गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा आगाराचे व्यवस्थापक मनोज भोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी लासगाव येथे, ३० नोव्हेंबर रोजी खडकदेवळा येथे, तर १ डिसेंबर रोजी लोहटार येथे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून गावातील महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार असून, लाभार्थ्यांनी सोबत आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक आहे.
दरम्यान, एनसीएमसी कार्ड काढण्याबाबत शासनाने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत दिलेली असल्याने लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. ज्या माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप कार्ड काढलेले नाही, त्यांनी संबंधित गावात आयोजित शिबिरात उपस्थित राहून लवकरात लवकर कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक मनोज भोई यांनी केले आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत






