जळगाव, 21 ऑगस्ट: ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्त निर्माण व्हावी, यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागांत पोलिसांची मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उपस्थिती राहिली.
सणांच्या काळात रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढत असल्याने बेशिस्त व धोकादायक वाहनचालना रोखण्यासाठी पोलिसांनी सकाळी, सायंकाळी तसेच रात्री ११ वाजेपर्यंत विशेष कारवाईवर भर दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, पोलीस दुरक्षेत्र, तिन्ही वाहतूक शाखा आणि महामार्ग सुरक्षा पथकाने मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कारवाईचे प्रत्यक्ष निरीक्षण व मॉनिटरिंग केले. त्यामुळे प्रमुख रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची प्रभावी उपस्थिती दिसून आली.

सणांचा आनंद घेताना नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. तसेच रस्त्यावर स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही विशेष मोहीम अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी आणि महामार्ग सुरक्षा पथकाने मोहिमेत उल्लेखनीय सहभाग नोंदविला.






