यावल, 7 ऑक्टोबर: शेतातील कुपनलिकेची (बोअरवेल) ७/१२ उताऱ्यावर नोंद घेऊन त्याचा उतारा देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर, उर्वरित एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना यावल तालुक्यातील आमोदा येथील तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शैलेश अंकुश झोटे (वय ३८), तलाठी, सजा आमोदा, ता. यावल, असे कारवाई झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय? –
तक्रारदाराने सिंचनासाठी शेतात कुपनलिका केली होती. शासनाच्या योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसविण्यासाठी शेताच्या ७/१२ उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद असणे आवश्यक होते. ही नोंद घेऊन उतारा देण्यासाठी तलाठी झोटे यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानुसार तक्रारदाराने यापूर्वी ३ हजार ५०० रुपये रोख दिले होते.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने कामाबाबत तलाठ्याकडे विचारणा केली असता, उर्वरित ५०० रुपये तसेच ७/१२ उताऱ्याची नोंद देण्यासाठी अतिरिक्त ५०० रुपये, असे एकूण एक हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने ६ ऑक्टोबर रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचेची रक्कम स्वीकारताच तलाठी एसीबीच्या जाळ्यात –
तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी झोटे यांनी यापूर्वी ३ हजार ५०० रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी आमोदा ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी तलाठी झोटे यांनी पंचांसमक्ष एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांच्या पथकाने केली.
हेही वाचा: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द






