जळगाव, 29 ऑगस्ट: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या संकल्पनेतून आज शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये व्यापक स्तरावर ‘स्वच्छता अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. शालेय परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानास संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अभियानात जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या (एसएमसी) सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. अभियानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनासोबतच विविध गावांतील भजनी मंडळे, महिला बचत गट व युवा मंडळांनीही उत्स्फूर्तपणे श्रमदानात सहभाग घेतला. व्यापक लोकसहभागामुळे या अभियानाला एका मोठ्या लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.
अभियानास गती देण्यासाठी तसेच अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून श्रमदान केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अमळनेर तालुक्यातील मालपूर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिक, अधिकारी व शालेय घटकांच्या सहभागाचे कौतुक केले.
तसेच शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी चोपडा तालुक्यातील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोल्या, शालेय परिसर, स्वच्छतागृहे तसेच परिसरातील इतर सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्यात आली. शिक्षण आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध असून स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, हा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवा मंडळे, शाळा व्यवस्थापन समित्यांचे सदस्य तसेच विद्यार्थी यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा स्वच्छ, सुंदर व विद्यार्थ्यांसाठी अधिक आरोग्यदायी बनविण्यासाठी अशाच प्रकारचा लोकसहभाग पुढेही कायम राहावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






