काठमांडू, 30 ऑगस्ट: नेपाळमधील महाप्रलयानंतर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुरक्षित मायभूमीत परतीची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी नागपूरचे १०६ भाविक रेल्वेने महाराष्ट्राकडे रवाना झाले असून, कैलास मानसरोवर यात्रेतील अन्य ३७ भाविक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेक दिवसांपासून कुटुंबीयांपासून दूर असलेल्या भाविकांच्या सुखरूप परतीमुळे नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधून अडकलेल्या भाविकांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली. काठमांडूहून चार खासगी बसच्या माध्यमातून १०६ भाविकांना सीतामढी येथे आणण्यात आले. त्यानंतर बिहार सरकारच्या मदतीने सर्व भाविक पाटणा येथे पोहोचले. पाटणाहून शनिवारी सकाळी ७.३६ वाजता रेल्वे क्रमांक १७६०९ने भाविक नागपूरच्या दिशेने रवाना झाले.
नागपूरच्या १०६ भाविकांपैकी चार जण विमानाने दिल्लीला पोहोचले असून, तेथून केरळ एक्स्प्रेसने नागपूरकडे रवाना झाले आहेत. उर्वरित १०२ भाविक रेल्वेने पाटणाहून नागपूरकडे रवाना झाले. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे दर्शनासाठी गेलेल्या या भाविकांचा परतीचा मार्ग अडचणीत आला होता. मात्र, प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे त्यांचा परतीचा प्रवास सुरक्षितपणे सुरू झाला.
दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांनाही मायदेशी आणण्यात आले आहे. हे भाविक मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर लोकप्रतिनिधी आणि नातेवाईक उपस्थित होते. भाविक सुखरूप परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील डॉ. आनंद देशपांडे आणि नानावटी रुग्णालयातील डॉ. गायत्री देशपांडे या डॉक्टर दाम्पत्याचाही नेपाळमध्ये संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी कुटुंबीयांशी त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या दाम्पत्यासह महाराष्ट्रातील इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून केंद्र व नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.






