जळगाव, 18 सप्टेंबर: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची’ ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करून अभियानाची निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत दोन सत्रांमध्ये ही कार्यशाळा झाली. ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची अंमलबजावणी करताना कोणती कार्यवाही करायची, विविध निकषांची पूर्तता कशी करायची, तसेच शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून ग्रामीण विकासकामांना गती कशी द्यायची, याबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अभियानाची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री होऊ नये, तर त्याचे सकारात्मक परिणाम ग्रामस्थांना प्रत्यक्ष जाणवले पाहिजेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले. अभियानातील प्रत्येक घटकाचा ग्रामपंचायतींनी बारकाईने अभ्यास करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शाबाना शहा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद चावरिया, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास सुपे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन सत्रांमध्ये झालेल्या या कार्यशाळेत अभियानातील विविध घटक, ग्रामपंचायत स्तरावरील कार्यवाही आणि आवश्यक कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियानाची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला आवश्यक दिशा देण्यात आली.






