चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नाशिक, 11 ऑक्टोबर: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’ अंतर्गत राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. जलव्यवस्थापन, स्वच्छता, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोकसहभाग या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे आज 11 ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यस्तरावर आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम –
ग्रामपंचायत गटात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवत 5 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवला. द्वितीय क्रमांकासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील खामशेत आणि नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लाडूद या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या दोन्ही ग्रामपंचायतीना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात येणार असून प्रत्येकी 1.50 कोटी रुपयांची पुरस्कार रक्कम मिळणार आहे. तसेच तृतीय क्रमांकासाठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोतवालबर्डी या ग्रामपंचायतींना विभागून पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी 1 कोटी रुपये पुरस्कार रक्कम म्हणून देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद गटात नाशिक अव्वल; पंचायत समिती गटातही नाशिकच प्रथम –
राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये जिल्हा परिषद गटात नाशिकने प्रथम, पुणेने द्वितीय, तर सांगली जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकावला. पंचायत समिती गटात नाशिक पंचायत समिती प्रथम, रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समिती द्वितीय, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पंचायत समितीने तृतीय क्रमांक मिळविला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 चा शुभारंभ –
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासह संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे करण्यात आला. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना गती देणे, मूलभूत सुविधा बळकट करणे, स्वच्छता व जलव्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आणि लोकसहभाग वाढविणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
मागील वर्षातील पुरस्कारप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचा गौरव करत नव्या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






