जळगाव, 27 ऑक्टोबर: यावल तालुक्यातील किनगाव येथे विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला धार्मिक स्थळासमोरून जाण्यास विरोध झाल्याच्या घटनेची पाहणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. किनगावमध्ये यापुढे कोणत्याही धर्माच्या मिरवणुकीला किंवा धार्मिक कार्यक्रमाला मुख्य मार्गावरून जाण्यास विरोध होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाहणीनंतर जळगाव येथील जीएम फाऊंडेशनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी किनगावमधील परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, किनगावमधील मुख्य रस्त्यांवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, शिवजयंतीचे कार्यक्रम, अंत्ययात्रा आणि विवाह मिरवणुका नेण्यास अनेक वर्षांपासून विरोध होत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. यंदा पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात ५७ जणांना आरोपी करण्यात आले असून, त्यापैकी १७ जणांना अटक करण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी अद्याप रुग्णालयात असल्याचे सांगत, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
किनगावमध्ये यापुढे कोणत्याही धर्माची मिरवणूक, शिवजयंतीची मिरवणूक किंवा अंत्ययात्रा मुख्य मार्गावरून जाण्यापासून रोखली जाऊ नये, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे रस्ते अडविण्याचे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, दीर्घकाळापासून चालत आलेली मानसिकता बदलण्याची गरज आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर देशातील सांस्कृतिक परंपरांना बळ देण्याचे काम सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात महाराष्ट्रातील प्रशासनाची भूमिका मागे गेल्याची टीका त्यांनी केली.
किनगावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक मिरवणुकांच्या मार्गांबाबत समान नियम लागू व्हावेत आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका सोमय्या यांनी मांडली. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने अशा प्रकारे दहशत किंवा दादागिरी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायद्याच्या चौकटीत उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.






