जळगाव, 11 नोव्हेंबर: क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा आदिवासी समाजाच्या हक्कांचा, स्वाभिमानाचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी बांधवांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार आणि मूलभूत सुविधांसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. या सप्ताहात एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
“भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा खरा सन्मान म्हणजे आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविणे होय. आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनासाठी शासन कटिबद्ध असून, प्रत्येक पात्र कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,” असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आदिवासी पाड्यांसाठी साडेबारा कोटींच्या पाणीपुरवठा योजना; ७० दुर्गम गावे व पाड्यांना सौरऊर्जेचा आधार –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आदिवासी समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा पोहोचविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आदिवासी पाडे – वस्त्यांवरील उर्वरित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या योजना राबविणार आहोत. तसेच रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील सुमारे ७० आदिवासी गावे व पाड्यांमध्ये सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – मंत्री संजय सावकारे
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे म्हणाले की, जल, जंगल आणि जमीन यांच्याशी अतूट नाते असलेल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा सेवा सप्ताह महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत. विशेषतः आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमियाची तपासणी व जनजागृतीवर भर द्यावा. तसेच शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दुर्गम भागातील मूलभूत सुविधांसाठी विशेष नियोजन – जिल्हाधिकारी रोहन घुगे
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अतिदुर्गम गावे व पाड्यांमध्ये अद्याप वीजपुरवठ्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच उर्वरित पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. दुर्गम भागातील रस्त्यांच्या विकासासाठी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना’अंतर्गत केंद्र शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून हा सेवा सप्ताह प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विकासासाठी शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय –
आदिवासी विकास विभागाने गेल्या दोन वर्षांत आश्रमशाळांमधील शिक्षक नियुक्ती, शिष्यवृत्ती, वसतिगृह व आरोग्यसुविधा, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगारासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या अनुदानातही वाढ करण्यात आली असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीतून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम –
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करून राबविण्यात आलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, सात शासकीय वसतिगृहे व नऊ आश्रमशाळांमध्ये अद्ययावत अभ्यासिका आणि गरम पाण्यासाठी हीट पंप, तर प्रत्येकी १७ वसतिगृहे व आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही व इन्व्हर्टर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सहा वसतिगृहे व सात आश्रमशाळांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण, १७ आश्रमशाळांमध्ये डिजिटल बोर्ड, तर ११ आश्रमशाळांच्या नवीन इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत. ‘सुंदर शाळा’ अभियानात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या आश्रमशाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि विज्ञान प्रदर्शनातील प्रत्येक वयोगटात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमानाने इस्रोच्या बंगळुरू किंवा अहमदाबाद येथील केंद्राची शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांच्या पाणीपुरवठा योजनांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रकल्प अधिकारी पवार यांनी सांगितले.
जनजातीय गौरव सेवा सप्ताहासाठी आदिवासी विकास विभाग सज्ज –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिली.
- ११ व १२ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदांद्वारे शासकीय योजनांची माहिती
- १३ नोव्हेंबर रोजी लाभार्थ्यांना लाभवाटप, महिला बचत गट व स्वयंरोजगार मार्गदर्शन
- १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता, दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम
- १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती व उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान
- १६ नोव्हेंबर रोजी आधारकार्ड, शासकीय कागदपत्रे व योजनांसाठी विशेष शिबिरे
- १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती
- १८ नोव्हेंबर रोजी रोजगार, कौशल्यविकास, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार व आर्थिक साक्षरता मार्गदर्शनाचे उपक्रम होणार आहेत.
दरम्यान, सर्व विभागांच्या समन्वयातून हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभाग सज्ज असल्याचे पवार यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती –
या पत्रकार परिषदेला वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सह प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे, यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






