चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव/मुंबई, 7 नोव्हेंबर: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ अंतर्गत विभागीय आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विजेत्या ग्रामपंचायतींमध्ये देवगाव ग्रामपंचायतीने प्रथम, अडावद ग्रामपंचायतीने द्वितीय, तर साकळी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील विजेत्या ग्रामपंचायतींना मिळालेले मानांकन आणि पुरस्कार रक्कम पुढीलप्रमाणे आहे:
- प्रथम पुरस्कार: देवगाव ग्रामपंचायत, ता. पारोळा (पुरस्कार रक्कम: रु. ५०.०० लक्ष)
- द्वितीय पुरस्कार: अडावद ग्रामपंचायत, ता. चोपडा (पुरस्कार रक्कम: रु. ३०.०० लक्ष)
- तृतीय पुरस्कार: साकळी ग्रामपंचायत, ता. यावल (पुरस्कार रक्कम: रु. २०.०० लक्ष)
लवकरच होणार पुरस्कार वितरण –
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हे अभियान राबवण्यात आले होते. तालुका आणि जिल्हास्तरीय मूल्यमापन समित्यांनी केलेल्या काटेकोर तपासणी आणि गुणांकनाच्या आधारे या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या विजेत्या ग्रामपंचायतींना लवकरच एका विशेष समारंभात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जळगाव जिल्ह्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल तसेच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी प्रभावीपणे राबवले. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले. त्याचे वेगवेगळ्या टप्प्यांवर मुल्यमापन झाले असून आता विभागीय आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत.
“देवगाव, अडावद आणि साकळी ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांचा लवकरच गौरव केला जाईल. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी यावर्षी पुरस्कारांची संख्या वाढवून तीन कॅटगिरी करण्यात आल्या असून गुणवत्तापुर्ण तसेच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा संकल्प आहे. आगामी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०’ मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल. तसेच, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘१ लाख जलतारा’ उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.”
- भाऊसाहेब अकलाडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव)
धुळ्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा देखील निकाल जाहीर करण्यात आला आहे. या अभियानात शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून रु. ५०.०० लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळवले. तसेच, शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक (रु. ३०.०० लक्ष) आणि साक्री तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार (रु. २०.०० लक्ष) जाहीर झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील विजेत्या ग्रामपंचायती कोणत्या? –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अत्यंत उत्कृष्ट ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानात नवापूर तालुक्यातील पळसून ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून रु. ५०.०० लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळवला आहे. त्यासोबतच, तळोदा तालुक्यातील तळवे ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार (रु. ३०.०० लक्ष) आणि नवापूर तालुक्यातील वावडी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार (रु. २०.०० लक्ष) जाहीर झाला आहे.
विभागस्तरावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची बाजी –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत नाशिक विभागाचा विभागस्तरीय निकाल जाहीर झाला आहे. या विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दुगांव ग्रामपंचायतीने (ता. जि. नाशिक) प्रथम क्रमांक पटकावून तब्बल रु. १.०० कोटी रुपयांचा भव्य पुरस्कार मिळवला आहे. त्याखालोखाल अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रेनबडी ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार (रु. ८०.०० लक्ष) आणि राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार (रु. ६०.०० लक्ष) जाहीर झाला आहे.
हेही वाचा: Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही






