जळगाव, 14 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुखपुरी गाव परिसरात आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाच्या 4.5 रेक्टर स्केलचा धक्का जाणवला. या भूकंपाचे धक्के जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्येही जाणवले. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, रावेर, यावल,सावदा, जामनेर,परिसरात सदर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याचेही जिल्हाधिकारी घुगे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
भूकंपामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा संबंधित शासकीय विभागाला माहिती द्यावी. प्रशासनाकडून तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.






