जळगाव, 12 नोव्हेंबर: सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (National Quality Assurance Standards – NQAS) या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरीय NQAS प्रमाणन प्राप्त झाले असून, यापैकी ३ उपकेंद्रांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणनही मिळविले आहे. जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने ही कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे.
जिल्ह्यात राज्यस्तरीय NQAS प्रमाणन प्राप्त झालेल्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाकडी, वाकोद व नेरी (ता. जामनेर), पिंपरखेड (ता. भडगाव), लोहारा (ता. पाचोरा), ढेकू, मारवड व जानवे (ता. अमळनेर) या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रांनी गुणवत्ता मानकांची पूर्तता करत राज्यस्तरीय प्रमाणन मिळविले आहे.
जळगाव जिल्ह्यात यापूर्वी २ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १७ उपकेंद्रांना राज्यस्तरीय NQAS प्रमाणन मिळाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण गुणवत्ता सुधारणा उपक्रमांमुळे नव्याने ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १०८ उपकेंद्रांनी हे प्रमाणन प्राप्त केले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमाणित आरोग्य संस्थांची एकूण संख्या आता ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ उपकेंद्रांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यापैकी ३ उपकेंद्रांनी राष्ट्रीय स्तरावरही गुणवत्ता प्रमाणन मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल –
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, NQAS नोडल अधिकारी डॉ. करिश्मा जैन तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीचे डॉ. पंकज शिंपी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने या मोहिमेचा पाठपुरावा केला. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे.
आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचे विविध निकषांवर मूल्यमापन –
NQAS प्रमाणन प्रक्रियेत आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवेचा दर्जा, रुग्णांचे हक्क, औषधांची उपलब्धता, प्रयोगशाळा सेवा, संसर्ग नियंत्रण, स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, अभिलेख व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच रुग्णांचे समाधान अशा विविध महत्त्वपूर्ण निकषांचे काटेकोर मूल्यमापन केले जाते. या निकषांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये नियमित अंतर्गत मूल्यमापन, त्रुटींचे विश्लेषण, सुधारात्मक कार्यवाही, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यावर विशेष भर देण्यात आला.
या यशामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत रुग्णांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि समाधानकारक सेवा मिळावी, या उद्देशाने सर्वांनी सांघिक भावनेने काम केले.
सांघिक प्रयत्नांतून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा नवा आदर्श –
८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२५ उपकेंद्रांचे राज्यस्तरीय प्रमाणन, तसेच ३ उपकेंद्रांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणन ही जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने गुणवत्ता, कार्यक्षमता आणि रुग्णसेवेच्या बाबतीत केलेल्या प्रगतीची महत्त्वपूर्ण पावती आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळणार आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, यापुढेही आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम






