पाचोरा, 22 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा भव्य सत्कार पार पडला. या कार्यक्रमात उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर पुन्हा वैध ठरविण्याच्या घडामोडींवर सुमित पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे संताप केल्याशिवाय तुमचा मुलगा सुमित पाटील राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी चांगले काम करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
‘माझ्या स्वभावाची जनतेला माहिती’ –
गेल्या पंधरा दिवसांतील आपला आक्रमक अवतार अनेकांनी पाहिला. मात्र, पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनता, ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांना आपला स्वभाव माहिती आहे, असे सुमित पाटील म्हणाले. काही जण संस्कारांवर प्रश्न उपस्थित करत असले, तरी आपल्या कुटुंबाला पंढरपूरच्या वारीची दीर्घ परंपरा लाभली आहे. त्यामुळे आपल्या संस्कारांबाबत बोलण्याचा अधिकार टीका करणाऱ्यांना नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘फोन करून फॉर्म बाद, पुन्हा वैध करण्यासाठी फोन’ –
उमेदवारी अर्ज बाद होणे आणि त्यानंतर पुन्हा वैध ठरणे, या प्रक्रियेवर सुमित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. “फोन करून माझा फॉर्म बाद करायला लावला आणि पुन्हा निवडणुकीसाठी फोन करून तोच फॉर्म वैध करायला लावला, हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले. राजकारणात असा प्रकार आपण यापूर्वी पाहिला नसल्याचे सांगत त्यांनी या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली.
जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा संकल्प –
आपले वडील किशोर आप्पा पाटील यांनी अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी काम करणार असल्याचे सुमित पाटील यांनी सांगितले. बँकेच्या सचिवांचे रखडलेले वेतन आणि सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बिनविरोध निवडीनंतर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद दिल्याबद्दल मतदार, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले. “तुम्ही माझ्यावर मुलगा, नातू आणि भाऊ म्हणून प्रेम केले. तुमच्या आशीर्वादामुळेच मी या टप्प्यावर पोहोचलो,” असे ते म्हणाले.

बिनविरोध निवडीबद्दल भव्य सत्कार –
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी पाचोरा नगरपालिका शिवसेना गटनेते तथा नगरसेवक सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज दुपारी पद्माजाई फार्म हाऊस, बांबरूड-महादेवाचे येथे भव्य सत्कार पार पडला.
याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, नगरसेवक तथा शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे, जिल्हा बँक निवडणुकीतील सहकार पॅनलचे उमेदवार यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






