पाचोरा, 17 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (२०२६-२०३१) निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून पाचोरा तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, “महाशक्तीचा आदेश आल्यानंतर अदृश्य शक्तीला मदत करावीच लागली!” अशा शब्दांत बिनविरोध निवड झाल्यानंतर सुमित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
‘अदृश्य शक्ती’चा मुद्दा होता चर्चेत –
जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, सुरुवातीला २ नोव्हेंबर २०२६ रोजी छाननी प्रक्रियेत भाजप उमेदवार सतीश शिंदे यांनी घेतलेल्या तांत्रिक हरकतीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर केला होता. अर्ज बाद झाल्यानंतर सुमित पाटील यांनी संताप व्यक्त करत, राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्ती’च्या हस्तक्षेपाने हा अर्ज बाद करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांत मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या निर्णयाविरोधात सुमित पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्याकडे अपील दाखल केले होते. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत सहनिबंधकांनी पाटील यांचा अर्ज कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवला आणि त्यांना निवडणुकीत लढण्याची संधी मिळाली.
‘….अन् सुमित पाटील यांची बिनविरोध निवड’ –
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या जागावाटपाच्या तडजोडीनंतर आज (१७ नोव्हेंबर २०२६) भाजप उमेदवार सतीश शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. परिणामी, पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरलेल्या सुमित पाटील यांची पहिल्याच प्रयत्नात बिनविरोध निवड निश्चित झाली.
पाचोऱ्यात शिवसेनेचा जल्लोष –
सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर पाचोऱ्यात शिवसेनेच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. आमदार किशोर आप्पा पाटील, सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करत ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत बिनविरोध निवडीचा जल्लोष साजरा केला. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतिष शिंदे यांची प्रतिक्रिया –
सतिष शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अर्जावर हरकत देखील घेतली होती. मात्र, पक्षात काम करताना वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळावे लागतात. म्हणूनच मी नेत्यांच्या आदेशाने माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासाठी मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेही आश्वासन घेतलेले नाही, किंवा कोणाच्याही दबावापोटी मी माघार घेतलेली नाही. बाकी, अदृश्य शक्तीनेच काहीतरी केले असेल, असे समजून चालायचे.”






