आडगाव (चाळीसगाव) 25 ऑक्टोबर : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदत 24 ऑक्टोबरला संपली आहे. परंतु, याबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा आमरण उपोषणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील आडगावातही अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाचा लढा शांततेत द्या –
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी आडगाव येथील मराठा समाजबांधवांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की, कोणाच्यातरी सांगण्यावरून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुठेही गालबोट न लागू देता हा लढा शांततेत दिला पाहिजे. तसेच कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारकडून आरक्षण मिळवूनच राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा –
मराठा आरक्षणाबाबत दिलीप पाटील यांनी आज सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, शिरसगाव येथे सकल मराठा समाजातर्फे 25 ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस साकळी उपोषणाला सुरूवात होणार आहे. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास चौथ्या दिवसापासून (28ऑक्टोबर) आमरण उपोषणाला बसणार असण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सरकारला दिलेली मुदत संपली –
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपल्यावर जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.