इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 नोव्हेंबर : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. दरम्यान, पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करा, अशी मागणी भाजपचे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. यासंदर्भात त्यांनी आज मंत्री महाजन यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी –
राज्यात यावर्षी बहुतांश ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडला आहे. परिणामी विविध भागात दुष्काळी परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील अतिशय कमी पाऊस पडल्याने शेतीवर विपरीत परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने पाचोरा आणि भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी भाजपचे पाचोरा भडगाव मतदार संघाचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत राज्य शासनाकडे केली आहे.
पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर –
राज्य शासनाने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबतचा निर्णय नुकताच घेतला आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यात तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
अमोल शिंदे यांच्या मागण्या –
पाचोरा व भडगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने कृषी कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी पीक कर्जाचे पुनर्गठन करावे, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकरचे नियोजन शेतीच्या पंपाचे वीजबिल माफ करून वीज पुरवठा अखंडित करावा, यासोबतच सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा व राज्य शासनाच्या वतीने देण्यात यावे, इत्यादी मागण्यादेखील निवेदनाद्वारे अमोल शिंदे यांनी केल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यात समावेश होणार? –
शासनाकडून लवकरच उर्वरित तालुक्यामध्ये महसूल व कृषि विभाग मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यभरातील तालुक्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होणार असल्याने यामध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीची आस लागली आहे.