शनिशिंगणापूर, अहमदनगर, 30 नोव्हेंबर : देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू शनिशिंगणापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती शनिशिंगणापूरात –
शनिशिंगणापूर देवस्थानच्या इतिहासामध्ये प्रथमच देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आज शनिशिंगणापूर येथे येत आहेत. राष्ट्रपती मुर्मू शनिशिंगणापूरात दाखल झाल्यानंतर सभामंडपात अभिषेक, चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाला तेलाचे अभिषेक, देवस्थान विश्वस्त मंडळाकडून सत्कार आणि त्यानंतर राष्ट्रपती महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहेत. राष्ट्रपती दोन तास मंदिर परिसरात राहणार असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेची तयारी केली आहे.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था –
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, या बंदोबसासाठी 8 पोलीस अधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 115 पोलीस उपनिरीक्षक, 13 पोलीस उपाधीक्षक आणि 900 कर्मचारी तैनात आहेत.
यांची राहणार उपस्थिती –
देशाचे राष्ट्रपती शनिशिंगणापूरला येत असल्यामुळे देवस्थाने ही जय्यत तयारी केली आहे. आज बारा वाजता राष्ट्रपती द्रोपदी मुर्म शनिशिंगणापूरला येणार असून त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत.