पुणे, 10 जानेवारी : संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला ज्या निकालाची उत्सुकता होती तो निकाल आता समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्र सुनावणी प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणून एकनाथ शिंदे सह सोळा आमदारांना अपात्र करता येणार नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितले. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत याविषयी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार काय म्हणाले?
आजचा निकाल आश्चर्यकारक वाटत नाही. आम्ही चर्चा करत असताना, आमचं मत असं होतं हा निर्णय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकर्यांना अनुकूल आहे, असं दिसत नाही. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यासह अनेक ठिकाणी हा निकाल काय लागेल, यावर भाष्य केलं होतं. त्यांना खात्री होती. तसाच हा निकाल लागला.
माझ्यामते, जो काही निकाल मी लागला, वकिलांशी चर्चा केल्यावर अधिक स्पष्टता येईल. हा निकाल वाचल्यानंतर सुप्रीम कोर्टात जावं लागेल. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. ती म्हणजे विधीमंडळ पक्ष आणि पक्षसंघटना, याठिकाणी निकाल घेतला आहे तो विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिले आहे. सुभाष देसाईंची जी केस होती, 11 मे 2023 त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या हा निकाल दिला आहे की, पक्षसंघटना महत्त्वाची आहे. उमेदवारांची निवड करतात, त्यांना पुढे करतात आणि तसेच त्यांना जे निवडतात, त्यांचा अधिकार महत्त्वाचा आहे. विधीमंडळ पक्ष आणि पक्षसंघटना महत्त्वाची आहे, असा निकाल सुभाष देसाईंच्या केसमध्ये दिला आहे.
याठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगत आहेत, त्यामध्ये त्यांनी अनेकदा सांगितलं विधीमंडळ पक्षात व्हिप कुणाचा आहे, आदेश कुणाचा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात म्हटलं आहे व्हिप आणि आदेश हा अधिकार पक्षसंघटनेला आहे विधीमंडळाला नाही. याठिकाणी व्हिपची निवड उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीने करण्यात आलेली नाही. 10 वी अनुसूची आम्हाला राजकीय पक्षात काम करणाऱ्या लोकांना दिशा देणारी आहे. त्यामध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. याच्यामध्ये आणखी एक व्हिपाचे उल्लंघन केल्यावर त्याच्यावर कारवाई करता येते, त्याला अपात्रही ठरवता येते. इथे काय झाले, इथे व्हिप मोडला, शिंदेच्या संबधीच्या लोकांची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आली. मात्र, व्हिप द्यायचे अधिकार नाही, असे म्हणत सभापतीने योग्य निर्णय घेतला नाही.
दुसऱ्या बाजूने, उद्धव ठाकरेंच्या वतीने स्पीकर निवडणुकीत पक्षाचा व्हिप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र करावे, अशी मागणी केली. स्पीकरने ही मागणी मान्य केली नाही. आणि दोन्ही बाजूच्या लोकांना पात्र ठवरले. याचा अर्थ स्पष्ट आहे, सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स ही यालापूर्णपणे यामध्ये घेतली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयात जायला उद्धव ठाकरेंना चांगलं आहे. सुभाष देसाईंच्या केसमध्ये उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला निकाल घेता आला असता. सर्वोच्च न्यायालयाचं हे भाष्य, हे महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली.
आगामी काळात निवडणुका आहेत, त्यामुळे हा निकाल जनतेच्या कोर्टात ठरणार. आमच्या सर्वांची भूमिका जनतेच्या समोर जाईल. हा राजकीय निवाडाचा निकाल आहे, हे जनतेसमोर मांडायला आम्हाला उत्तम संधी आहे. हा कार्यक्रम आमच्या वतीने लवकर सुरू होईल.