ईसा तडवी, प्रतिनिधी
जळगाव, 15 जानेवारी : राज्यात जून 2022 मध्ये मोठा राजकीय भूकंप घडला. शिवसेनेत फूट पडल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यावर आता आमदार किशोर पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले आमदार किशोर पाटील? –
आम्ही जे काही केले आहे, तो उठाव केला आहे, ती गद्दारी नाही, असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी केले. जळगावात आयोजित केलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील महायुतीतील नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
ती गद्दारी नाही –
आमदार किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेना, भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर विरोधात उभे राहिलो. लढलो सोबत पण सत्ता विरोधकांसोबत स्थापन केली आणि पुन्हा आज पुन्हा सोबत आलो आहोत, मात्र, आज आम्ही जे काही केले आहे ती गद्दारी नाही, तर तो उठाव होता. वर नेत्यांमध्ये समन्वय असेल तर खालीही तो हवा, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.
आमदारांनी व्यक्त केली खंत –
बाजार समितीची निवडणूकीसाठी मी शिवसेना-भाजप युतीचे सर्व उमेदवार घेतलेत भाजपमधील सर्वांना मला सांगितले आम्ही येतोय, मात्र अचानक असे काय झाले की, त्यांनी फोनही उचलले नाहीत आणि कार्यक्रमालाही आले नाहीत, अशी खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली.
महायुती म्हणून लढवूया –
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आमचे काही चुकत असेल तर आम्हाला जोड्याने मारा, पण आमच्यात चाललेले वादळ जर कुणाच्याच लक्षात येत नसेल तर हे अत्यंत वाईट आहे. येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढवूया आणि प्रचंड बहुमत मिळवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा : पाचोरा येथील ट्रकचालकांच्या नवीन कायद्याविरोधातील आमरण उपोषणाला मानवाधिकार संघटनेचा पाठिंबा