नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार गटाला मिळाले आहेत.
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर सुनावणी पार पडली होती. यामध्ये आता राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणुक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयानंतर हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट –
मागच्या वर्षी 2 जुलैला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गटाने, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह 9 आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राष्ट्रवादीकडून ही कारवाई झाल्यानंतर दोन्ही गट निवडणूक आयोगात गेले होते.
यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या या सुनावणीवेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तवाद करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नसल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला गेला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात, अजित पवारांनी सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा केला होता.
Ajit Pawar gets Nationalist Congress Party name and symbol
after more than 10 hearings spread over more than 6 months.
‘Test of Legislative majority’ clinches symbol in view of disputed internal organizational elections
Read detailed order here : https://t.co/5Ir1QKhQVC— Spokesperson ECI (@SpokespersonECI) February 6, 2024
या आमदार-खासदारांचे प्रतिज्ञापत्रही अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिले होते. तसंच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचंही आयोगाला कळवलं होतं, यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्याबाबतची नोटीस दिली होती. पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.