नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंहराव आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करत ट्विटरवर सांगितले की, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला तसेच देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करत ट्विटरवर सांगितले की, चौधरी चरणसिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण आयुष्यात योगदान दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा देशाचे गृहमंत्री किंवा साधे आमदार असतानाही त्यांनी केवळ राष्ट्र निर्माणाला महत्त्व दिले. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम अशी भूमिका घेतली होती. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहिल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करत ट्विटरवर सांगितले की, कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करत असताना मनस्वी आनंद वाटत आहे. अतिशय आव्हानात्मक काळात स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.
हेही वाचा : मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर