मुंबई, 5 मार्च : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाबाबत चुरस असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल आणि आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका घेत जागावाटपांसदर्भात महत्वाची चर्चा केल्याचे समजते. दरम्यान, शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 10 पेक्षाही कमी जागा मिळू शकतात, अशा चर्चा रंगल्या आहेत, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ठीकरण दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? –
देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा मिळणार, ही केवळ पतंगबाजी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला इतक्याच जागा मिळणार, अशा चर्चा होणे अयोग्य आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आमचे साथीदार असून त्यांना आम्ही जागावाटपात योग्य तो सन्मान देऊ. शिवसेना, राष्ट्रवादीला सिंगल डिजिट जागा मिळणार, हे माध्यमांनी स्वत:च ठरवले आहे. ही बातमी धादांत चुकीची आहे, असे स्पष्ठीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
भाजपचे नेते दिल्लीत –
देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य सध्या दिल्लीत गेले आहेत. महाराष्ट्राच्या कोअर कमिटीला बोलवण्यात आले असून आता केंद्रीय नेतृत्त्व आमच्याशी जागावाटपांसदर्भात चर्चा करेल. दरम्यान, युती असलेल्या राज्यांमधील भाजप उमेदवारांची यादीही जाहीर होईल. यासंदर्भात तुम्हाला वेळोवेळी योग्य माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.