महेश पाटील, प्रतिनिधी
अंतुर्ली (पाचोरा), 27 मार्च : लग्नानंतर करिअर करणे, हे अनेकांना आव्हानात्मक वाटते. असेच आव्हान हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील विद्या पाटील यांनी पार करत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विद्या पाटील यांनी लग्नानंतर केलेली यशस्वी करिअरची वाटचाल ही ग्रामीण भागातील युवक-युवतींना प्रेरणादायी ठरणारी आहे. विद्या पाटील यांची प्रेरणादायी स्टोरी जाणून घेऊयात सविस्तर.
काय आहे संपूर्ण बातमी?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा 2022 परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत विद्या पाटील यांनी यश मिळवत नगरपालिका मुख्याधिकारी (क्लास -1) या पदाला गवसणी घातली. विद्या पाटील या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक या गावाच्या कन्या आहेत. सध्या त्या नाशिक येथे वस्तू व सेवाकर कार्यालयात राज्यकर निरीक्षक (STI) या पदावर कार्यरत आहेत.
विद्या पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास –
विद्या पाटील या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली बुद्रूक या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील राजेंद्र पाटील हे शेतकरी आहेत तर आई प्रतिभा पाटील या गृहिणी आहेत. विद्या पाटील यांचे प्राथमिक शिक्षण हे अंतुर्ली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर सहावी ते दहावीचे शिक्षण त्यांनी पाचोरा येथील पी. के. शिंदे हायस्कूलमधून पूर्ण केले. यानंतर 11 वी आणि 12 वीचे शिक्षण त्यांनी पाचोरा येथीलच एस.एस.एम.एम. कॉलेज येथून पूर्ण केले.
विद्या पाटील यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल माहिती दिली, त्या म्हणाल्या की, दहावीला असताना वडिलांनी मला वचन दिले होते की, जर 75 टक्के गुण मिळाले तर तुला नवीन सायकल घेऊन देईल. त्यामुळे मी त्यांनी दिलेले आव्हान पूर्ण केले. यानंतर त्यांनी त्यांचे वचन पूर्ण करत मला सायकल घेऊन दिली. यानंतर 11 वी आणि 12 वीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी त्यांचे मूळ गाव अंतुर्ली ते पाचोरा असा सायकलवर प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले.
मुक्त विद्यापीठातून घेतले शिक्षण –
विद्या पाटील यांनी बारावीनंतर अध्यापिका विद्यालय जळगाव येथून 2011 या वर्षी डीएडचे शिक्षण पूर्ण केले. डीएड झाल्यानंतर गावात शिकवणीही घेतल्या. यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि इतिहासात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर 2013 साली त्यांचा विवाह पिलखोड येथील पुरुषोत्तम शिरसाठ यांच्याशी झाला. ज्यांची पी. एस.आय.म्हणून निवड झालेली होती. सध्या ते सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलिस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
विवाह झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेसाठी तयारी –
विद्या पाटील यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी स्वप्नांच्या पुर्ततेसाठी मेहनत घेतली. यासाठी विद्या पाटील यांना त्यांच्या कुटुंबातून पाठिंबा मिळाला. विद्या पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर लग्न झालं त्याच वर्षी 2013 मध्ये पी. एस.आय. पदासाठीची पूर्व परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. 21 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची शारिरीक चाचणी होती. मात्र, त्याच दिवशी त्यांना मुलगी झाली आणि त्यामुळे त्यांना पी.एस.आय. साठी शारिरीक चाचणी देता आली नाही.
विद्या पाटील यांना त्यांचे त्याचे पती यांनी दरम्यानच्या काळात साथ दिली आणि निराश न होता, पुन्हा तयारी करण्यासाठी प्रेरित केले. दरम्यान, 2021 या वर्षी त्यांनी खऱ्या अर्थाने तयारीला सुरुवात केली. सर्व परिस्थितीवर मात करत कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर अभ्यास सुरू ठेवला आणि मागील दोन वर्षात त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल चार सरकारी नोकऱ्यांना गवसणी घातली. सध्या त्यांची मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्याही क्लासविना केली तयारी –
कोणताही क्लास न लावता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांनी मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमात स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहिले. सेल्फ स्टडीवर भर देत जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत अभ्यास करत त्यांनी पूर्णवेळ तयारी केली आणि आज हे यश मिळवले, असल्याचे विद्या पाटील यांनी सांगितले.
विद्या पाटील यांनी दिला सल्ला –
आयुष्यात एक पाऊल टाकणे खुप महत्त्वाचे असते. आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची असेल तर स्वत:वर विश्वास ठेवत काम करा. शेवटी यश अपयश मिळतेच. पण पूर्ण प्रयत्न करुनही जर तुम्हाला अपयश मिळत असेल तर ते काही यशापेक्षा कमी नाही आणि यश मिळेल हे तर हमखास आपलेच असते, असा सल्ला त्यांनी यावेळी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना दिला.
हेही वाचा : Special Story : जळगाव जिल्ह्यातील श्रृतीची अभिमानास्पद कामगिरी, पहिल्याच प्रयत्नात MES परिक्षेत उत्तीर्ण