चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अमरावती, 29 मार्च : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच अमरावती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. अमरावतीच्या महिला खासदार नवनवीत राणा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्याचे विरोधक प्रहारचे बच्चू कडूंनी राणांविरोधात बड्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रहारचे पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नाराजी दर्शवित राणा यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले होते. तसेच नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करणार असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आज प्रहार पक्षाच्यावतीने दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. येत्या 3 एप्रिल रोजी ते लोकसभा निवडणुकसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
प्रहार पक्षाच्यावतीने अमरावती शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवनीत राणांविरोधात प्रहारच्यावतीने दिनेश बुब निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच प्रहारचे अमरावती जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यामुळे महायुतीतर्फे प्रहारला अमरावतीची जागा मिळावी, अशी आम्ही मागणी केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असल्याचे प्रहारचे राजकुमार पटेल यांनी सांगितले.
खासदार नवनीत राणा यांनी स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राज्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमरावती मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीला जिल्हा पातळीवर मोठ्या प्रमाणात विरोध असताना त्यांना उमेदवारी दिल्याने महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांच्यासह प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीविरोधात दंड थोपटले आहे.
हेही वाचा : भाजपचं ठरलं मात्र ठाकरे गटाचं काही ठरेना! स्मिता वाघ यांच्याविरोधात जळगावात कुणाला मिळणार संधी?