चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
चाळीसगाव, 6 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून माजी खासदार उन्मेष पाटील यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजप व ठाकरे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
चाळीसगाव येथे आज भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी महायुती कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर निशाणा साधला. मागच्या वेळी स्मिता वाघ यांचे ऐनवेळी तिकीट कापले पण त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र, त्यांना (उन्मेष पाटील) तिकीट दिले नाही तर त्यांनी लगेच पक्ष सोडला, असे ते म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन उन्मेष पाटील यांच्यावर टीका करत म्हणाले की, मोठे मोठे नेते थप्पीला लागले असून तुमचे तर काहीच नाही. जर तुमची इकडे ताकद होती, काम केले आहे तर स्वतः लोकसभा लढवायची होती, यांच्या त्यांच्या खांद्यावर का बंदूक ठेवली. तुम्ही शिवसेना ठाकरे गटात गेले आहात आता बघा कसा उबाठाचा फफुटा उडतो, असा टोला त्यांनी उन्मेष पाटील यांना लगावला.
मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटलांवर टीका –
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील उन्मेष पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. चाळीसगाव हा तालुका भाजपचा बालेकिल्ला असून या तालुक्याने अनेक नेतृत्व जिल्ह्याला, राज्याला दिले आणि पक्षात अनेक चढउतार आले तरी त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र, ज्यांना अवघ्या 10 वर्षात आमदारकी – खासदारकी मिळाली, जे 8 दिवसांपूर्वी पक्षाला आई म्हणत होते, त्यांना पक्षाने एक संधी नाकारताच आई सारख्या पक्षाशी बेईमानी केली. असे व्यक्ती कोणत्याही विचारधारेशी किंवा पक्षाशी एकनिष्ठ नसतात, उलट समाजासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी घातक असतात, अशी जोरदार टीका मंगेश चव्हाण यांनी केली.
यांची होती उपस्थिती –
यावेळी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, रिपाई जळगाव लोकसभा प्रमुख आंनद खरात, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, महायुतीचे घटकपक्ष शिवसेना तालुकाध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्यासह महायुतीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.