चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
चोपडा (जळगाव), 9 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील वैभवी ठाकरे या तरुणीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधून राज्यकर निरीक्षक (STI) या पदी OBC महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 मधून मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी (Assistant section Officer -ASO) आणि राज्य कर निरीक्षक (STI) या दोन्ही पदी म्हणजे एकूण तीन पदांसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशानंतर सुवर्ण खान्देश लाईव्हने तिची विशेष मुलाखत घेतली. यावेळी तिने स्पर्धा परीक्षा, तिचा प्रवास, ग्रामीण भागातील परिस्थिती या सर्व विषयांवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केलं.
वैभवीची शैक्षणिक पार्श्वभूमी –
वैभवी ठाकरे ही चोपडा शहरातील रहिवासी आहे. तिचे वडील चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. तर आई गृहिणी आहेत. तिची लहान बहिण ही शिक्षिका तर लहान भाऊ हा बी. फार्मसीचे शिक्षण झाल्यानंतर इंदूर येथील कंपनीत कार्यरत आहेत. वैभवी हिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी हे सानेगुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे झाले. त्यानंतर सहावी ते दहावीचे शिक्षण हे विवेकानंद विद्यालय चोपडा येथे पूर्ण झाले. 2009 मध्ये वैभवीने दहावीला 92.76 टक्के गुण मिळवत तालुक्यात मुलींमध्ये पहिली येण्याचा मान मिळवला होता. यानंतर 2011 मध्ये बारावीचे शिक्षण हे चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज, येथून 86 टक्के मिळवत पूर्ण केले. तर 2015 मध्ये नाशिक येथील के के वाघ कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
स्पर्धा परिक्षेच्या प्रवासाला सुरुवात –
सुवर्ण खान्देश लाईव्ह सोबत बोलताना वैभवीने सांगितले की, शासकीय अधिकारी व्हायचे हे तिने शालेय जीवनापासूनच ठरवले होते. त्यामुळे पदवीच्या शिक्षणानंतर तिने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2015 मध्ये ती पुण्याला गेली. 2015 ते 2016 या कालावधीमध्ये तिने पुण्यातील द युनिक अॅकॅडमी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र, यानंतर सुरुवातीची दोन तीन वर्ष तिला यूपीएससीच्या परिक्षेत अपयश आले. त्यामुळे मग तिने एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला.
2019 पासून तिने एमपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. पण यानंतरही 2019 आणि 2020 मध्ये सलग दोन वेळा पूर्व परीक्षेतच अपयश आलं. यामुळे मग मी यानंतर एमपीएससी राज्यसेवेसोबत कम्बाइन परीक्षेचीही तयारी सुरू केली. यानंतर 2021 पासून सलग मुख्य परीक्षांपर्यतही तिने मजल मारली. 2022 च्या परीक्षेमध्ये ती मुलाखतीपर्यंतही पोहोचली. पण तिला 12 मार्क कमी मिळाल्याने राज्यसेवेच्या अंतिम यादीत तिची निवड होऊ शकली नाही.
मात्र, यानंतर 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षांच्या एमपीएससी संयुक्त परीक्षेत तिने बाजी मारली आणि विक्रीकर निरीक्षक पदी तिची निवड झाली. विशेष म्हणजे या मध्ये 2022 च्या परीक्षेत ती ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात पहिली आली. डिसेंबर 2023 मध्ये या परीक्षेचा निकाल आला. यामध्ये ती विक्रीकर निरीक्षक झाली. त्यासोबत मागच्याच महिन्यात लागलेल्या निकालात तिची पुन्हा विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आणि आता याच महिन्यात लागलेल्या निकालात मंत्रालय सहायक अधिकारी म्हणूनही तिची निवड झाली आहे.
‘या’ यशाबाबत काय म्हणाली वैभवी –
अजून माझा प्रवास संपला आहे, असं मला वाटत नाही. कारण सुरुवातीच्या काळात उमेदवाराला एक विशिष्ट पदच आपण मिळवावं असं वाटतं. हवी तितकी मॅच्युरीटी नसते. मात्र, जेव्हा या क्षेत्रातली आव्हानं, खाचखळगी कळायला लागतात त्यावेळी पदापेक्षा नोकरी ही फार महत्त्वाची वाटायला लागते. त्यामुळे मग तेव्हा दृष्टीकोन बदलतो. आपल्या हातात काहीच नसताना काहीतरी मिळणं हे महत्त्वाचं आहे. त्याच दृष्टीकोनातून मी गट ब च्या परीक्षा दिल्या. माझं मुख्य स्वप्न अजूनही राज्यसेवेतून वर्ग-1 चे पद मिळवणे हेच आहे. पण आता मी जे यश मिळवले आहे, ते मी स्विकारणार असून या पदाला मी 100 टक्के न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन, असे ती यावेळी म्हणाली.
निकालाचा तो क्षण –
डिसेंबरमध्ये ज्या दिवशी माझा निकाल लागला, त्या दिवशी माझा निकाल लागेल हे अनपेक्षित होतं. त्यात ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात पहिली येणं, अत्यंत आनंददायी होतं. यासाठी फक्त 6 जागा होत्या. जिथं निदान सहाव्या क्रमांकावर तरी मी यावी, अशी अपेक्षा असताना मी पहिल्या क्रमांकावर आली, ही खूपच आनंददायी भावना होती. कारण या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्यात एमपीएससीसाठी मी कोणत्याही कोचिंग किंवा क्लासची मदत न घेता तयारी केली. पुण्या मुंबईला न जाता चोपडा येथे राहूनच मी सेल्फ स्टडीवर भर दिला.
Unacademy सोबतचा अनुभव –
2019 आणि 2020 मध्ये जेव्हा मी पूर्व परीक्षा नापास झाले तेव्हा मला जरा डगमगल्यासारखे वाटले होते. हे क्षेत्र मला सोडायचे नव्हते. मात्र, मला यासोबतच मला अभ्यासाला मदत होईल आणि आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होईल, तसेच थोडी प्रेरणा मिळेल यासाठी Unacademy या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर Unacademy Toppers’ talk या कार्यक्रमाला मी होस्ट केले. त्यामध्ये एमपीएससीमधील निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती मी घेतल्या. मे 2021 ते मे 2023 या कालावधीमध्ये मी याठिकामी काम केलं. हे काम करत असताना विविध अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादातून आपलं नेमकं काय चुकतंय किंवा काय राहून जातंय, हे समजून घेण्यात मदत झाली आणि त्यातूनही मला खूप प्रेरणा मिळाली. पण याठिकाणी मी आवर्जून सांगेन, Unacademy बाबत मला भूषण धूत सरांनी सुचवलं होतं. त्यामुळे मी त्यांचेही मी आभार मानते, असे ती म्हणाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय सांगशील –
आधीच्या तुलनेत आता आपल्याकडे स्पर्धा परीक्षांबाबत चांगल्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाली आहे. अनेक अधिकारी याठिकाणी तयारी झाले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत आहे. मात्र, आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत की नाही हे विद्यार्थ्यांना कळणे महत्त्वाचे आहे. आपल्या क्षेत्रातील वरिष्ठांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. तसेच एकाग्रतासुद्धा महत्त्वाची आहे. आयोगाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका हेच तुमच्याशी एकप्रकारे संवाद साधत असतात. त्यामुळे यांना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे.
आई वडिलांची भूमिका फार महत्त्वाची –
माझ्या प्रवासात आई वडिलांची भूमिका फार महत्त्वाची राहिली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी जे काही करत होते, त्यासाठी त्यांनी मला वेळ दिला. ती लोकं माझ्यासाठी ढाल बनून राहिले. मी बालपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने समाजातील लोकं मला ओळखत होते. त्यामुळे 2015 मध्ये सुरू झालेला माझा प्रवास हा इतका लांबेल हे कुणालाच वाटलं नव्हतं. म्हणून आई वडिलांनी प्रत्येक प्रसंगात मला साथ दिली. माझी स्वप्न त्यांच्यासाठी फार महत्त्वाची होती. म्हणून त्यांनी मला वेळ घेऊ दिला.
स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी आणि आत्महत्या –
स्पर्धा परीक्षा मी का करतोय हा विचार महत्त्वाचा आहे. हे जर कारण स्पष्ट असेल तर निराशा कमी येईल. तयारी करत असताना ज्यांना नैराश्य आलं नसेल, असे उमेदवार फार कमी असतात. नैराश्या दरम्यान, आपलं आजूबाजूचं सर्कल कसं आहे, तुमच्या नकारात्मक काळामध्ये तुम्हाला किती उभारी देणारी आहेत, तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्या निदर्शनास आणून देत आहेत का, हे फार महत्त्वाचं आहे. पण यासोबतच आई-वडिलांचा पाठिंबाही फार महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अनेकदा होत असलेल्या खर्चाचंही ओझंही विद्यार्थ्यांवर असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घ्यायला हवा.
शहराच्या तुलनेत मी ज्याठिकाणी ग्रामीण भागात राहतोय, त्या ठिकाणी राहून हा अभ्यास होऊ शकतो का यासोबतच मला हा प्रवास किती लांबवायचा आहे, विद्यार्थ्यांनी यावरही विचार व्हायला हवा. मानसिक आणि आर्थिक या दोन्ही दृष्टीने हे मला परवडायला हवं. आपल्या अवतीभवती असलेली माणसं फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तयारीदरम्यान, एक-एक मिनिट महत्त्वाचा आहे. त्यामुळे नकारात्मक लोकांचा तुमच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो, म्हणून विद्यार्थ्यांनी सकारात्मक वातावरणात राहायला हवं. यासोबत आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, परीक्षेपेक्षाही तुमचं जीवन हे फार महत्त्वाचं आहे, हे कायम लक्षात ठेवायला हवे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना दिला.
ग्रामीण भागातील पालकांना संदेश –
ग्रामीण भागातील पालकांना मी सांगेन की, आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. मुलांनीही आपल्या आईवडिलांचा विश्वास संपन्न केला पाहिजे. या प्रवासात अपयश येऊ शकतं, ती वेळही सांभाळता येणं ही महत्त्वाची आहे. यासाठी संवाद महत्त्वाचा आहे.