कोल्हापुर, 27 एप्रिल : देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उन्हाच्या पाऱ्यासह राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज कोल्हापुरत येणार आहेत. कोल्हापुरातील राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्याचे अचानकपणे नियोजन केल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात –
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत. तसेच कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार नियोजन केले जात आहे. तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्रीपासूनच कोल्हापुरात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नियोजनासाठी ते थांबल्याची माहिती हाती आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेचे अचानक नियोजन –
कोल्हापुरात दोन्ही उमेदवार हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचाराचे नेतृत्व आमदार सतेज पाटील करत आहेत. महायुतीकडून संजय मंडलिक त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, शाहू महाराजांवर होणाऱ्या टीकेला सतेज पाटलांकडून उत्तर देण्यात येत असल्याने ही लढत आता महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी न होता थेट सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशी होत आहे. दरम्यान, शाहू महाराज यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच, कोल्हापूरच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक सभा लावण्यात आल्याची चर्चा आहे.
कोल्हापुरात ‘या’ उमेदवारांमध्ये लढती –
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे डी. सी. पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत.
हेही वाचा : महायुतीचे शक्तीप्रदर्शन : जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल