जळगाव, 1 मे : राज्यात एकीकडे तापमानात वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र राज्यात पाणी टंचाई भासू लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाण्याच्या साठ्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देत राज्याचे पाणीपुरवठा मत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले आहे.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, यंदा राज्यभरात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला असून त्याचा थेट परिणाम हा धरण साठ्यावर झाला आहे. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. तसेच यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने तो पाणीसाठा ही वेगाने घटत असल्याने पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.
राज्यातील पाण्याची परिस्थिती –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, सध्या राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. तसेच पुढील काळात गरज पडल्यास त्याची संख्या अजून वाढू शकणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या-त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी पाण्याची बचत करण्याचा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.