चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 4 मे : लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यांतबंदी उठवलेली असून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता त्यांचा कांदा परदेशात कुठेही पाठवता येणार आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदी मुळे शेतकरी नाराज असल्याने केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. शेतकऱ्यांना 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करता येणार आहे. तसेच 31 मार्च 2025 पर्यंत देशी चण्याच्या आयातीवर शुल्कात सूट दिली असून हे बदल 4 मे पासून लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
निर्यातबंदी उठवण्याची शेतकऱ्यांची होती मागणी –
राज्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने उभारली होती. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत होती. दरम्यान, कांद्याच्या निर्यातीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतलेला हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
कांदा कुठेही निर्यात करता येणार –
सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर मध्यंतरी केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता सरसकट निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कांदा विदेशात कुठेही निर्यात करता येणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले होते. दरम्यान, आता चार महिने 27 दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 40 टक्के ड्युटी व 550 डॉलर प्रति मेट्रिक टन शुल्क देत कांद्याची निर्यात करता येणार आहे.