चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे, 4 मे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल महत्वाचे भाष्य केले आहे. फडणवीस हे सुडाच राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.
काय म्हणाले विनोद तावडे? –
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढलो बाळासाहेबांची मते भेटली. मग, आम्हाला सोडून जाता याला गद्दारी म्हणत नाही का? आम्ही विचारांवर युती केली होती. तसेच फडणवीस हे सुडाच राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते, असेही ते यावेळी म्हणाले. भाजपमध्ये सर्व निर्णय हे केद्रीय नेत्यांशी चर्चा करुन घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतले जातात, असेही ते म्हणाले.
संजय राऊत देखील भाजपात आले असते –
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप हा भारतीय जनता पक्षावर होत आहे. दरम्यान, यावर विनोद तावडे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत अनेक जणांवर चार्जशीट दाखल झाले असून हे सगळे दबावतंत्र असल्याचे बोलले गेले. मात्र, दबावतंत्र असते तर संजय राऊत हे देखील भाजपात आले असते,
राज्याच्या राजकारणाबद्दल काय म्हणाले? –
विनोद तावडे हे गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दरम्यान, विनोद तावडे राज्याच्या राजकारणात एन्ट्री करणार अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मी राज्याच्या राजकारणात येणार नसून सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच आहे, अशी भूमिका विनोद तावडे यांनी स्पष्ठ केली.