चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : अक्षय्य तृतीया म्हणजे खान्देशातील आखाजी या सणाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खान्देशात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात तीन टप्प्यातील मतदान संपले असून आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. यानिमित्ताने नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हीना गावीत यांच्या तसेच खान्देशातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारला येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शुक्रवारी 10 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सभा होणार आहे. दोंडाईचा रस्त्यावरील अहिंसा स्कूलच्या शेजारील पटांगणावर नरेंद्र मोदींची सभा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. तसेच सभास्थळीच त्यांच्या हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.
आखाजीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खान्देशात –
अक्षय्य तृतीयेच्या सणाला खान्देशात आखाजी असे म्हटले जाते. दिवाळी, दसरा इतकेच खान्देशातील आखाजी या सणाचे विशेष महत्त्व आहे आणि याच आखाजीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खान्देशात येत आहेत. नंदुरबार येथे त्यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे आज या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, मतदारांना काय आश्वासन देणार, काय आवाहन करणार, तसेच विरोधकांवर कसा निशाणा साधणार याकडे खान्देशवासियांचे लक्ष लागले आहे.