चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 12 मे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान संपले आहे. आणि येत्या सोमवारी, 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, उमदेवारांना निवडणून आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रचार तोफा काल सायंकाळी थंडावल्या.
खासदारकीसाठी उद्या होणार मतदान –
राज्यातील चौथ्या टप्प्यात पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेत खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार या तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप उमेदवार स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीकडून करण पवार निवडणुकीच्या मैदानात आहे. यासाठी उद्या, 13 मे रोजी मतदान होणार आहे.
दोघांमध्ये काट्याची लढत –
यंदाची लोकसभा निवडणूक जळगाव मतदारसंघासाठी विशेष ठरत आहे. कारण भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत महिला उमेदवाराला तिकीट दिल्याने जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून येण्याची संधी स्मिता वाघ यांच्यासमोर आहे. तर दुसरीकडे उन्मेश पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले करण पवार यांना अनपेक्षितपणे उमेदवारी जाहीर झाल्याने ते देखील पहिल्यांदाच बाजी मारण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, स्मिता वाघ यांना उमेदवारी झाल्यानंतर एकतर्फी वाटणारी ही लोकसभा निवडणूक करण पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काट्याची ठरत आहे.
उमेदवारांच्या प्रचारासाठी पार पडल्या जाहीरसभा –
स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभा पार पडल्या. तर दुसरीकडे करण पवार यांच्या प्रचारासाठी जळगावात उद्धव ठाकरे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, स्मिता वाघ असो की करण पवार या दोघं उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
स्मिता वाघ की करण पवार? –
स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न केले. तर दुसरीकडे उन्मेश पाटील यांच्यासह करण पवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन केले. महायुतीतील नेत्यांकडून ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जळगाव जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवत जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली जात आहे.
एकीकडे स्मिता वाघ यांच्यासाठी महायुतीतील तीन मंत्री, चार आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे संघटन, पक्षासाठी एकनिष्ठपणे काम केल्याची प्रतिमा आहे. तर दुसरीकडे करण पवार यांच्यासाठी उन्मेश पाटील यांनी पक्षप्रवेश केल्याने त्यांना मिळालेली सहानुभूती, मतदारसंघासाठी नवा युवा चेहरा यासारख्या जमेच्या बाजू आहेत. असे असताना जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ की करण पवार, यापैकी कोण बाजी मारणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालातून स्पष्ठ होणार आहे.
हेही वाचा : जळगाव, रावेर, नंदूरबारमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस, खान्देशात नेमकी काय आहे परिस्थिती?