चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 17 मे : रामदेववाडी अपघात प्रकरणी वेळीच जर प्रशासाने कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले असते. लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करत असल्याचा आरोप माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता केला. जळगावात ते माध्यमांसोबत बोलत होते.
रामदेववाडी अपघातावर काय म्हणाले? –
गेल्या काही दिवसांपुर्वी रामदेववाडी येथे भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत न्याय मिळण्याच्या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला. यावर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, आम्ही त्याठिकाणी गावातील नागरिकांसोबत संवाद साधला. अपघातात दोषी असलेल्यांना हे संरक्षण देत आहेत. गोरगरीबांवर अन्याय करण्याचे काम ते करत आहेत. दोषींना मुंबईला पाठवण्यात यांचा हात आहे. याचा अर्थ गरिबांना न्याय नाही का? या मंत्र्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता लगावला.
लोकशाहीचा खून करण्याचे काम –
रामदेववाडी अपघात प्रकरणात पोलिस यंत्रणेवर दबाव आहे. मात्र, पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता याप्रकरणात जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही उन्मेश पाटील यांनी सांगितले. वेळीच जर प्रशासाने कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले असते. लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करत असल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला.
रामदेववाडी अपघात प्रकरण –
जळगाव पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला होता. या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर मृत महिलेच्या भाचा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या तरूणाचा देखील रात्री उशिराने मृत्यू झाला. या अपघातप्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामदेववाडीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला.